नमस्कार. मी सौरभ. मूळचा अकोला जिल्ह्यातला. गाव मळसूर, तालुका पातुर, जिल्हा अकोला. जन्म अकोल्याचाच आणि शिक्षण ही अकोल्यातच बारावीपर्यंत. सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातच जन्मलो. बालपण शालेय जीवन सुद्धा सामान्यच. बारावीनंतर engineering ला, BE computer साठी पुण्यात admission मिळाली. शेवटच्या वर्षाला येता येता हा निष्कर्ष पक्का झाला की मला शहरात राहून स्वतःची उपयोगिता दिसत नाहीये. इथे स्वतःला prove केल्यापेक्षा आजोळच्या गावाला म्हणजे मळसुरला जावं आणि तिथे कर्तृत्व सिद्ध करावं. आणि गावी राहायचं म्हणजे व्यवसाय म्हणून शेती उत्तम करावी . ही माझी college पर्यंतची निष्कर्ष यात्रा.
पुढे चांगली शेती कशी करावी हा शोध सुरू झाला. सेंद्रिय शेती / नैसर्गिक शेती कशी करावी , कोण करताय हे शोधत होतो. योग जुळून आले आणि अपूर्वा आदिती यांची भेट झाली. दोन बहिणी शेतीची काही background नसताना, वैचारिक conviction च्या जोरावर शेती करतात हे सगळच माझ्यासाठी अनाकलनीय होते. पण त्यांचा वज्र निर्धार बघून माझं कुतूहल बनून राहिलं.
पहिल्यांदा शेतावर गेलो तेव्हा शेताचं स्वरूप हे असं होतं.
आणि तेंव्हा यांचा नियम असा होता की प्रत्येक कष्टाचं काम स्वतःच्या हातानेच करायचं. मी भेटलो February 2011 मध्ये. तेव्हा नुकताच शेतावर मातीच्या घर बांधणीला सुरुवात केलेली.
बरं यांच्या शेताबद्दल थोडं सांगतो. 2007 मध्ये संचेती कुटुंबानी सणसवाडी , सिंहगड रोड येथे शेती घेतली. ही शेत जमीन म्हणजे खडकाळ माळरान. इथे शेती करायची म्हणजे खडकाला धडकच होती.
कोणी एकेकाळी येथे भात शेती व्हायची म्हणे. गेली तीस वर्षे पडीत राहिलेली. हे काय कमी म्हणून विट भट्ट्यांसाठी सगळी माती खरवडून नेलेली.
अशी सुरू झाली प्रयत्नांची शेती..
मग येथे शेती कामाचा अनुभव असणारे जोडपे राहायला आले. त्यांच्यासाठी बांबूच्या ताटीचे घर उभारले.
त्यांच्या मदतीने छोटे छोटे भाज्यांचे प्लॉट केले. पाण्याची वेगळी सोय नव्हतीच. जे करावं ते पावसाळ्यातच. मग मातीचे ढीग करून त्यावर पालेभाज्या वेल भाज्यांची लागवड करायचे.
पुढील तीन वर्षांचा काळ आदिती अपूर्वा यांनी नैसर्गिक शेतीच्या अभ्यासासाठी समर्पित केला. श्री भास्कर सावे, सुभाष शर्मा, भाऊ फुटाणे यांकडे जाऊन राहिले. कारण केवळ पुस्तकी ज्ञान उपयोगी नव्हते . तर जीवनशैली म्हणून शेती व श्रमाची स्वीकृती व्हायला हवी ही दृढ धारणा होती. याजसाठी केला हा सगळा अट्टहास.
असो. Back to 2011 February. मातीच्या घर बांधण्याची सुरुवात. घराचे Architect मालक सिंग. मुंबईचे . Ecological society मध्ये त्यांची आणि आदिती ची ओळख झालेली. मालक सिंग यांचे हे पहिलेच मातीचे घर. मग ठरलं असं घर आपणच बांधायचं. स्व कष्टाने, स्वतःच्या हाताने. त्यांचा अंग मेहनतीचा, श्रमाचा अभ्यास होताच. पण सगळ्यांच्या क्षमतेचा कस लागणार होता. कारण फेब्रुवारी 2011 मध्ये बांधकाम सुरू झाले आणि जून च्या आधी घराचे छप्पर पूर्ण करणे आवश्यक होते.
घराच्या भिंती ह्या cobb wall पद्धतीने बनवायच्या होत्या. त्यासाठी एका खड्ड्यामध्ये माती आणि भाताचे तूस असे एकावर एक थर चढवायचे. तो खड्डा पाण्याने भिजवून काढायचा आणि मग तो चिखल पायाखाली तुडवून काढायचा.
दुसऱ्या दिवशी हा चिखल घमेल्यात भरून दुसरीकडे ढीग लावायचा. खड्डा रिकामा झाला की नवीन बॅच ची तयारी सुरू. आणि इकडे ह्या चिखलाचे cobb balls बनवायचे म्हणजे मोठे मोठे गोळे बनवायचे.
घराच्या पायाचे बांधकाम सुद्धा दगड मातीमध्येच केलेले. आणि wall corner विटा आणि मातीच्या mortar मध्ये उभे केलेले. Cobb balls ची भिंत म्हणजे हे गोळे एकावर एक मारत घ्यायचे. त्या compression मुळे compact भिंत तयार होते. इतर technical गोष्टी अपूर्वा व्यवस्थित सांगू शकेल.
एवढी ढोर मेहनत करायची माझी पहिलीच वेळ. 12-12 तास आम्ही सलग काम करायचो. जून महिन्याची deadline डोळ्यापुढे असायचीच. मी दमून बसायचो. पण आदिती अपूर्वा थांबून पुन्हा कामाला लागायच्या. लागायच्या म्हणजे तुटून पडायच्या. मग मी लाजे काजेस्तव पुन्हा उठून कामाला लागायचो. Weight loss एवढा झाला की गालाची हाडं वर आलेली.
आता घराला आकार यायला लागला. बघता बघता भिंत छताच्या उंचीला येऊन टेकली. आणि छताच्या कामाला सुरुवात झाली. आणि हा काळ होता मे महिन्याचा , रणरणत्या उन्हाचा.
छत करायचे होते कौलांचे. गावात बऱ्याच लोकांनी कौलारू छत काढून पत्र्याचे शेड केले किंवा concrete slab तरी टाकले होते. त्यांनी कौलं घराबाहेर रचून ठेवलेली होती. ठरलं असं त्यांची ही कौलं विकत घ्यायची आणि आपल्या छताला वापरायची. मग काय कौलांचा ढीग घेऊन पडला आणि आम्ही कामाला लागलो. कौल कित्येक वर्ष धूळ खात पडलेली होती. कौलांची स्वच्छता करायला सुरुवात केली.
मे महिना असल्यामुळे अवकाळी पावसाची सुरुवात झाली होती. त्यामुळे रात्री बे रात्री पाऊस येणार असं वाटलं की घर झाकायला जायला लागायचं. कौलारू छतकामासाठी सुतार बोलविले. त्यांच्या सोबतीला सणसवाडी गावातील अनुभवी कामगार होतेच. बघता बघता छताचे काम पूर्ण झाले. ह्या सगळ्या कामात वेळोवेळी अपूर्वाची आई, जयश्री, राजश्री, दिलीप व इतर मित्र परिवार यांची मदत मिळाली.
अशाप्रकारे दिलेल्या deadline मध्ये घराचे छत पडून ओके झाले होते. संपूर्ण प्रक्रिया अगदी थोडक्यात मोजक्या शब्दांमध्ये सांगायचं मी प्रयत्न केला. मी आधी म्हटलं तसं सर्वांच्या क्षमतेचा कस लागलाच पण शिकायला बरच काही मिळालं. स्वतः श्रमाशिल झाल्याशिवाय दुसऱ्याच्या श्रमाचे मोल कळत नाहीत. घराचे बाह्य काम बऱ्यापैकी झाले. घराच्या आत भरपूर काम बाकी होते. आणि घराला घरपण अजून यायचे होते. त्यासाठी पूर्णवेळ शेतावर येऊन राहणे क्रमप्राप्त होते. त्याबद्दल सविस्तर बघुयात
CHAPTER 2: 'मुक्काम पोस्ट सणसवाडी' मध्ये.
No comments:
Post a Comment